दुष्काळ

Poems Add comments
Dushkal
दुष्काळ – I
 
 
आकाश उजाड मोकळ हाय 
आता संकटाच ढग  दाटलंय 

जमिनी पेक्षा मोठ्या भेगांनी 

आता माझ काळीज फाटलंय 
 
भुई कोरडी कोरडी 
पाण्याचा टिपूस  म्हणून न्हाई 

उभी पीकं जळाली 

आता उस नाही की कापूस न्हाई 
 
खावया दाणा न्हाई 
घोटभर पाण्यावर रातीच जेवण भागलय 
मानसाच तर सोडा आता 
जनावराच डोळ सुदिक आकाशाकड लागलय 
 
पाठीला पोट टेकलेल्या 
लेकरांचे हाल बघायालोय 
स्वतः स्नि  मारून लेकरांचं काय होईल  
एवढा इचार करून कसनस जगायलोय 
 
सरकारनी वरून किती दिले तरी 
आमच्या पतूर काय पोहचत न्हाई 
पुढारीच सगळं गिळून घेतो 
तरी त्याच्या मनातला दुष्काळ काय जात न्हाई 
 
~ दीप
**********************************************************************************
**********************************************************************************
दुष्काळ – २ 
 
पाणी जर का जीवन हाय
तर इथं मरणाचा तांडव राजरोस चालतोय 
लहान पोरास्नी सुदिक बाहेर पडू द्यायना म्या 
वर आकाशात गिधाड घिरट्या घालतोय 
 
असा का कोपला असन द्येव की 
आता लांब लाब पातुर पाणी भेटना 
पाणी फकुत डोळ्यात दिसायलंय  
डोळ्यातून काय ते आटता आटना 
 
​हजार रुपयाच कर्ज फिटणा म्हणून 
सावकारान होती नव्हती भांडी पण नेली 
गळ्याच्या पोतीत एक बी पिवळा मनी ठेवला नाही 
बायकोला पार लंकेची पार्वती केली ​


 
एका झाडावर वर पान नाही की 
एखाद झुडूप सुदिक जिवंत नाही राहिलंय 
अंगानी भरलेल्या जनावरांचा सांगाडा होतांना
म्या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय 
 
जनावर नुसती बसून हाईत 
उभं राहायच पण आता त्यांच्या अंगात त्राण न्हाई 
लक्ष्मी गाय पडून होती दोन दिस 
आणलेला वैदू म्हणाला पुरा हिला आता तिच्यात आता प्राण न्हाई 
 
जनावर इकायची म्हंटल तरी 
कोणी इकत घेइना 
उपाशी आपल्या दारात मेल्याच चालन 
पण कत्तलखान्याला इकायच पाप माझ्याकडून होइना 
 
​~ दीप Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.